मी कुठल्या योगाचा मार्ग स्विकारू?

Read this article in:
English |
Gujarati |
Hindi |
Marathi |
Russian |
Spanish |
Tamil

आधुनिक हिंदुधर्मग्रंथांत आध्यात्मिक साधनांचा सर्वसामान्य सारांश योगाच्या चार मार्गांनी वर्णिलेला असतो: कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग. या प्रत्येक मार्गाचे संक्षिप्त वर्णन करू या आणि नंतर या प्रश्नाचा विचार करू: वर्तमान मी कुठल्या योगाच्या किंवा योगांच्या मार्गांचे अनुसरण करू?

कर्मयोग हा कार्य करण्याचा मार्ग आहे. आपण काय करू नये यापासून त्याची सुरुवात होते. त्यानंतर आपण स्वार्थी इच्छांपासून प्रेरित झालेल्या कार्याचा त्याग करतो. त्यानंतर जागृत मनोवृत्तीने आपल्या जीवनातले कर्तव्य करण्याची इच्छा होते. निस्वार्थी मनोवृत्तीने इतरांना मदत करणे हे कर्मयोगाचे एक महत्वाचे अंग आहे. माझे परमगुरु, श्रीलंकेचे योगस्वामी, यांनी या आदर्शाच्या सारांशाचे असे वर्णन केले: “सर्व कर्म परमेश्वराचे सान्निध्य प्राप्त होण्याच्या उद्देशाने केले पाहिजे.”

भक्तियोग हा परमेश्वराच्या भक्तीचा आणि परमेश्वरावर प्रेम करण्याचा मार्ग आहे. देवाबद्दल कथा श्रवण करणे, भक्तिगीतांचे गायन करणे, तीर्थयात्रा करणे, मंत्रजप करणे, आणि देवळांत आणि स्वगृही देवपूजा करणे या कृती या मार्गाची साधने आहेत. भक्तियोगाचे फळ म्हणजे परमात्म्याशी उत्तरोत्तर सान्निध्य, आणि हे सान्निध्य शक्य करणार्‍या गुणांचा उत्कर्ष: प्रीति, निस्वार्थ, पवित्रता, आणि सरतेशेवटी प्रपत्ति आणि परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, यांनी याचे अतिशय सूचक वर्णन केले आहे:”परमेश्वर प्रेम आहे, आणि परमेश्वरावर प्रेम करणे हा आगमात उपदेशिलेला एक सत्वशुद्ध मार्ग आहे. खरे तर हे ग्रंथ (आगम) संसारी व्यक्तीला, पुनर्जन्माच्या चक्रांत भटकणार्‍या जीवाला क्षणभंगुर विषयांचा त्याग करण्यासाठी आणि अमर्त्याचे भजन करण्यासाठी स्वतः परमेश्वराचाच एक उपदेश आहेत. परमेश्वरावर कुठे आणि केव्हा प्रेम प्रगट करावे, कुठले मंत्र म्हणावे, आणि कुठले रूप मनःचक्षुपुढे कुठल्या मुहूर्तावर पहावे हे सर्व या आगमात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

राजयोग हा ध्यानाचा मार्ग आहे. आठ क्रमवार प्रगतीपर पायर्‍यांची ही एक साधना आहे. त्या पायर्‍या आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि. मनोवृत्तींच्या विकारांचा निग्रह करण्यात येथे लक्ष केंद्रित करण्यात येते, जेणेकरून आपली जागृत मनोवृत्ती, जी या विकारातून व्यक्त होत असते, आपल्या मूलभूत स्वरूपात स्थित होऊ शकते. मनोवृत्तींचा निग्रह अभ्यास आणि वैराग्य यांच्या मदतीने प्राप्त होतो. माझ्या गुरुदेवांनी चैतन्य या शब्दानी या कल्पनेचे स्पष्टीकरण केले आहे ते असे: “चैतन्य आणि जागृति, जागृति ही स्थिति आणि ज्या विषयाबद्दल ही जागृति असते तो विषय जेव्हा एकच असतात, तेव्हा चैतन्य आणि जागृति समान असतात. या दोन अवस्थांना वेगळे करणे म्हणजेच कौशल्यपूर्ण योगाभ्यास.”

ज्ञानयोग हा ज्ञानाचा मार्ग आहे. सत् आणि असत् यांचा विवेक आणि शास्त्रविचार ही याची प्रमुख अंग आहेत. ज्ञान या शब्दाचे मूळ “ज्ञ” म्हणजे माहिती असणे हे असले तरी ज्ञान या शब्दाला तत्वज्ञानीय अर्थ अभिप्रेत आहे. हे फक्त बुद्धिवादी ज्ञान नसून त्यात साक्षात्कार हा अनुभवही असतो. त्याची सुरुवात बुद्धीवादापासून होते आणि शेवट साक्षात्कारात होतो. ज्ञानयोगात तीन प्रगतीपर साधना असतात: श्रवण (धर्मग्रंथ ऎकणॆ), मनन (विचार/चिंतन करणे), आणि निध्यासन (सदैव सखोल ध्यान करणे). उपनिषदांतील चार महावाक्ये या चिंतनाचा विषय आहेत:”प्रज्ञानं ब्रह्म,” “तत्वमसि,” “अयमात्मा ब्रह्म,” आणि “अहम् ब्रह्मास्मि.” चिन्मय मिशनचे संस्थापक, स्वामी चिन्मयानन्द, यांनी असे शिकविले: “विवेकबुद्धीने सत् आणि असत् यांच्यामधील फरक जाणून घेणे आणि शेवटी स्वतःचे आणि परब्रह्माचे रूप एकच आहे याचे ज्ञान होणे हेच ज्ञानयोगाचे ध्येय आहे.”

या चार मुख्य योगांचे संक्षिप्त विवेचन केल्यानंतर विविध शाखांनी त्यांचे कसे अनुकरण केले आहे ते बघुया. आपल्या वर्तमान आध्यात्मिक प्रगती स्थितीत स्वतःसाठी कुठला योग योग्य आहे त्याचा निर्णय घेण्यास याची मदत होईल.

प्रथम आणि सर्वत्र प्रसिद्ध उपक्रम असा आहे की स्वतःच्या मनोवृत्तीप्रमाणे योगमार्ग निवडणे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या वेदान्त मण्डळाने (The Vedanta Society of Southern California) त्यांच्या वेब साईटवर असे मार्गदर्शन केले आहे: आध्यात्मिक आकांक्षा असलेल्या लोकांची मानसशास्त्र विचाराने चार प्रकारात विभागणी करता येते, ती अशी: भावनाप्रधान, बुद्धिवादी, शारिरिक परिश्रमी, आणि ध्यानी. या प्रत्येक मानसशास्त्रीय विभागाच्या व्यक्तींसाठी एका प्रमुख योगाची निवड केली आहे. याप्रमाणे भावनाप्रधान लोकांसाठी भक्तियोग, बुद्धिवादी लोकांसाठी ज्ञानयोग, परिश्रमी लोकांसाठी कर्मयोग, आणि ध्यानी लोकांसाठी राजयोग सुचविलेले आहेत.
तथापि कधीकधी बुद्धिवादाकडे मन वळणार्‍या लोकांना ज्ञानयोगापासून दूर राहण्यास सांगण्यात येते. “मूढांसाठी हिंदुधर्म” (Hinduism for Idiots) या पुस्तकांत लिंडा जॉन्सन समजावून सांगतात: “तुम्ही स्वतःला हुशार समजता? आश्चर्याची गोष्ट ही आहे की हिंदु गुरु बरेचदा बुद्धिवादी लोकांना भक्तियोगाचा मार्ग घ्यायला सांगतात, ज्ञानयोग नाही. कारण बुद्धिमंत लोकांना आपले अंतःकरण मोकळे केल्याचा फायदा होतो. ज्ञानयोग हा केवळ बुद्धिवादी लोकांसाठी नसून ज्या लोकांच्या सिद्धीभावाची उत्तम वृद्धी झाली आहे आणि ज्यांना परमेश्वराच्या प्रत्यक्ष साक्षात्काराची प्रबळ इच्छा झालेली असते त्यांच्यासाठी आहे.

द्वितीय उपक्रम असा की आपल्या वृत्तीप्रमाणे एका मुख्य़ योगमार्गाचे अनुसरण करावे आणि इतर मार्गांचेही पालन दुय्यम दर्जाने करावे. दैवी जीवन समाज (Divine Life Society) चे संस्थापक स्वामी शिवानंद यांचे असे मत होते की जरी साधक नैसर्गिकरित्या एका मार्गाकडे आकर्षित होत असतात तरी सुद्धा खरे प्राज्ञत्व प्राप्त होण्यासाठी प्रत्येक योगमार्गानी मिळालेल्या शिक्षणाचे त्याच्या आयुष्यात संयोजन झाले पाहिजे. त्यांच्या संघटनेचे ब्रीदवाक्य, कर्म, भक्ति, राज आणि ज्ञान योगांच्या संदर्भाने आहे: “सेवा, प्रेम, ध्यान, साक्षात्कार.”

तिसरा उपक्रम म्हणतो की या चार योगमार्गापैकी एक अत्युच्च मार्ग आहे आणि सर्वांनी तो मार्ग स्विकारला पाहिजे. वैष्णव संघटना भक्तियोगाचा किंवा भक्तिपूर्ण अनुष्ठानांचा आपल्या अनुयायांमध्ये प्रचार करतात. तात्पर्य, वैष्णव पंथ निरतिशय प्रेम आणि संपूर्ण शरणागति या दोन मार्गांवर चित्त केंद्रित करतो. याशिवाय, भक्तिभावाच्या अभ्यासासाठी आणि पवित्रीकरणाच्या तयारीसाठी कर्मयोगाचे पालन करणे निर्देशित करण्यात येते. श्री रामानुजाचार्य म्हणतात की ध्यानाच्या तयारीसाठी किंवा परमात्म्याच्या ध्यानमय स्मृतीसाठी आपण कर्मयोगाचे पालन करावयास हवे.

काही वेदान्ती प्रथा ज्ञानयोग हा मार्ग सर्वांसाठी आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ, आदि शंकराचार्यांच्या स्मार्त पंथात ज्ञानयोगाकडे जाण्यासाठी कर्मयोगाची एक प्राथमिक साधना म्हणून पालन करतात. त्यात ज्ञानयोगाची व्याख्या “तत्त्वज्ञानविवेकावर आधारित ध्यान” अशी केली आहे. ही कल्पना शंकराचार्यांच्या “विवेकचूडामणि” या ग्रंथात आढळून येते: “कर्म हे मनाच्या पवित्रिकरणासाठी आहे, परमात्म्याच्या प्रतितिसाठी नाही. सत्यज्ञानाचा प्रत्यय विवेकाने येतो, कोट्यावधी कर्माने नाही.

चौथा उपक्रम आहे कर्मयोग, भक्तियोग आणि राजयोग या तीन्ही योगांचे पालन. हे योग ज्ञानयोगाची साधना, ईश्वराशी असलेल्या ऎक्याची अनुभूति येण्यासाठी, सुरु करण्यासाठी पूर्व आवश्यक साधना आहेत. न्यू यॉर्क शहरातील विश्व धर्म मंडलम् चे स्वामी रामकृष्णानंद यांनी असे लिहिले आहे की: “ज्ञानयोगांत पदार्पण करण्याआधी शिष्याने कर्मयोग आचरणात आणायला हवा, परमेश्वराची भक्ति करून भक्तियोग आणि ध्यान करून राजयोगाचे पालन करावयास हवे. कारण, पूर्वतयारी नसतांना या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यास स्वतः एक “ओष्ठ वेदान्ती” होण्याची शक्यता असते. ही व्यक्ति ज्या गोष्टीबद्दल खरे ज्ञान नाही त्याबद्दल वक्तव्य करीत असते.

शिवानंद योग वेदान्त केन्द्राचे स्वामी विष्णुदेवानंद यांनीही एक तत्सम कल्पना सुचविलेली आहे: “ज्ञानयोगाची साधना करण्यापूर्वी साधकाने इतर योगमार्गांचे शिक्षण आपल्या जीवनात आत्मसात करायला हवे. कारण, निस्वार्थ्य, परमेश्वरावरील प्रीति, शरीर आणि मनाची शक्ति, यांशिवाय स्वयंसिद्धी हे एक रिकामे तर्कवितर्क ठरतील.

सद्गुरु शिवाय शुभ्रमुनीयस्वामींनी या चौथ्या प्रकारच्या साधनेची योग्यता ओळखली. त्यांनी असे म्हटले: ” कर्मयोग आणि भक्तियोग हे त्यावरून उच्च तत्वज्ञानासाठी आणि साधनेसाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या पायर्‍या आहेत.” वस्तुतः त्यांनी असे शिकविले की योग संचित कार्याच्या पायर्‍या आहेत. शिवाय, यापैकी कुठल्याही मार्गाचा प्रगति होत असतांना त्याचा त्याग करू नये. भक्तिबद्दल ते म्हणाले:”देवालयातील पूजा आपल्यासाठी कधीच पूर्ण होत नाही. आपली या चार आध्यात्मिक स्तरांवर प्रगति होत असतांना ही पूजा अधिकाधिक गहन आणि महत्वपूर्ण होत जाते. कर्मयोगात (चर्यापादात), निस्वार्थी सेवेच्या मार्गात, आपण देवालयात जातो कारण ते जाणे आपल्याला आवश्यक असते, आपल्याकडून ती अपेक्षा असते. भक्तियोगात (क्रियापादात), प्रेममय भक्ति साधनेच्या पायरीवर, आपण देवालयात जातो कारण ते आपल्याला करावेसे वाटते म्हणून, परमेश्वरावर असलेले आपले प्रेम आपल्याला त्यासाठी प्रवृत्त करते. योगपादात आपण परमेश्वराची पूजा अंतर्मुख होऊन, आपल्या हृदयाच्या मंदिरात करतो. तरी सुद्धा अपूर्व चैतन्याच्या गहन सागरात निमग्न अंतःकरण असलेल्या योग्याला देखील हे देवालय अनावश्यक झालेले नसते. तेथे-भूलोकावर असलेल्या देवाच्या घरात- योगी आपल्या साधारण चेतनेवर परत येतो. देवालयातील पूजा एवढी परिपूर्ण आहे की जे ज्ञानमार्ग पादाक्रांत करतात तेच पूजनीय विषय ठरतात- सजीव, चालते, फिरते देवालय ठरतात.

कुठला योग मार्ग स्विकारावा याबद्दल गोंधळलात? अर्थातच तुम्हाला गुरु असतील तर हा विषय त्यांच्याशी चर्चा करण्यास अत्युत्तम आहे. जर तुम्हाला गुरु नसतील, तर प्रथम कर्मयोग आणि भक्तियोग साधना करावी. हे योग अहंकारावर शीघ्र कार्य करतात आणि गहन सिद्धी प्राप्तीसाठी असलेले सर्व अडथळे, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून मार्गावर असतांनाच जे दूर करता येणार नाहीत असे अडथळे, दूर करतात. यांच्या साधनेचे फायदे होतात ते असे: मनाचे हळुवार शुद्धीकरण, अमानित्वाची वृद्धी, निःस्वार्थ वृत्ति, भक्तिची वृद्धी होत असल्याचा भाव, आणि आपले सर्व कार्य स्थिर गतीने आपल्याला परमेश्वरकडे नेईल याबद्दल निश्चितता.

Leave a Comment

Your name, email and comment may be published in Hinduism Today's "Letters" page in print and online. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top