सार्वदेशिक साथीने घातलेल्या बंधनांनी आपल्याला आपल्या योजना अद्यावत् करण्यासाठी आणि आपल्यासाठी आणि आपल्या कुटुम्बासाठी भविष्य उज्वल करण्यासाठी वेळ मिळवून दिला आहे.
सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी
कोव्हिड-19 या सार्वदेशिक साथीने वैयक्तिक आणि कौटुम्बिक दैनंदिन जीवनातल्या अडचणी नेहमीपेक्षा फारच जास्त असल्याचे दिसून आले आहे. संचारबंदी, मुखाच्छादन, सामाजिक अंतर यांमुळे आपले जीवन आपल्या भविष्याचा विचार न करता सांप्रत आव्हानावर वाजवीपेक्षा जास्त केंद्रित झाले असावे. या चंचल स्थितिने मला असे सुचवण्यासाठी प्रेरित केले आहे की आपण ही साथ संपल्यानंतर आपण काय करावे, आपले ध्येय काय असावे याचा विचार करण्यासाठी वेळ काढावा. ते ठरल्यानंतर आपण ते साध्य होण्यासाठी त्यांसाठी सहायक योजनांवर काम करायला सुरुवात करू शकतो. ही संकल्पना तुम्हाला तुमच्या वैयक्तिक, कौटुम्बिक, व्यवसायिक, आणि तुम्ही जर एखाद्या लाभनिरपेक्ष संस्थेत भाग घेत असाल तर त्यांच्यासाठी सुध्दा लागू पडते. याचे एक महत्वाचे कारण हे आहे की या सार्वदेशिक साथीनंतरचे जीवन या आधीच्या जीवनासारखे मुळीच राहणार नाही. महत्वाचे बदल घडून आलेले असतील आणि आपले ध्येय आणि योजना यांनी त्या बदलांना लक्ष्यात ठेवले पाहिजे. कार्यालयाच्या बाहेरून काम करणे अधिक प्रमाणात राहील, आणि मुलांच्या शिक्षणाकडे अनेक महिन्यांच्या “ऑनलाईन” शिक्षणामुळे अधिक लक्ष्य द्यावे लागेल. देवालयांवर मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यावर बंधने राहतील, त्यामुळे आध्यात्मिक कार्यांसाठी इतर मार्ग उपलब्ध करावे लागतील.
माझ्या गुरुजींनी या योजनेचे चार पायर्यामध्ये विभजन केले आहे. त्यांनी एक सूत्र लिहिले आहे, ते असे: “शिवभक्त प्रत्येक उपक्रम मुद्दाम व्यवस्थित विचार करूनच हाती घेत्तात. ते त्यांच्या प्रत्येक कार्यात एक स्पष्ट उद्देश्, एक सज्ञान योजना, चिकाटी आणि इच्छाशक्ति यामुळे यशस्वी होतात.”
उद्देश
प्रथम “स्पष्ट उद्देश” या कल्पनेकडे बघू या. यालाच दुसरी संज्ञा आहे धेय. आर्थिक धेय हे नेहमीच सर्वांच्या मनांत पुढे असते- आपल्या मासिक गरजा पूर्ण करणे, निवृत्तीकालासाठी बचत करणे आणि मुलांच्या शिक्षणाची सोय् करणे. शैक्षणिक धेय, ते मुलांच्या धर्मनिरपेक्ष शिक्षण आणि प्रौढांनी नवीन कलाकौशल्य शिकणे हे सर्वसाधारणपणे दुय्यम दर्जाचे असते. खरे तर हे धेय जीवनाच्या आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शारिरिक अंगाबद्दल असावेत. त्यांची उदाहरणे अशी असू शकतात:
आध्यात्मिक: दूरच्या मंदिरांच्या तीर्थयात्रा, हटयोगाचा अधिक अभ्यास
सामाजिक: विशेष कौटुम्बिक सहली, सेवा व शिक्षणाच्या कार्यक्रमांत भाग घेणे
सांस्कृतिक: संगीत, कला, नाट्य, नृत्य यांसारख्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे,
शारिरिक: नियमित व्यायाम, आहार, घर, सवय़ी, पोशाख यांत सुधारणा, पर्यावरणाची काळजी घेणे.
योजना-
स्पष्ट उद्देशापासून एका सज्ञान योजनेकडे जाणे – गेल्या काही वर्षात मला लोकांशी त्यांच्या धेयप्राप्तीबद्दल आणि त्यांत ते यशस्वी झाले की नाही ते विचारण्याच्या अनेक संधि मिळाल्या. त्यांच्या अपयशामागे अनेक कारणे आहेत. परन्तु, धेय अवघड असले तर त्यात अपयश येण्याचे कारण सहसा एका सज्ञान योजनेचा अभाव हे असायचे. ही योजना पूर्ण विचार करून केलेली नसायची. सर्व बाबतीत त्यांत पूर्ण बारकाईने पुरेसा तपशीलवार विचार नसायचा. तो एक विचारपूर्वक केलेल्या योजनेऐवजी एक आवेग असायचा. कुठल्याही कठीण कार्याची योजना करावयाची असल्यास इतरांचा सल्ला घेणे उचित असते. तुम्ही स्वतःच सर्व नीट ठरवू शकणार नाही. त्या क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तीशी सल्लामसलत करण्याची तुम्हाला गरज आहे. उदाहरणार्थ, हवाईच्या स्थावर मालमत्तेच्या व्यवसायात विचित्र चढ उतार होत असते. तुम्हाला हवाईत घर विकत घेण्याची इच्छा असेल तर तेथल्या या व्यापाराचे ज्ञान असलेल्या लोकांशी बोलावे. नाही तर तुम्ही चुकीच्या वेळी विकत घ्याल आणि त्याचे दुष्परिणाम भोगाल. व्यापाराच्या कुठल्याही मोठ्या उपक्रमात, ज्यात तुम्ही आपल्या आयुष्यात केलेली पूर्ण बचत गुंतवणार असाल तर एखाद्या सल्लागाराला नियुक्त करून योग्य तो सल्ला मिळेल याची खात्री असणे शहाणपणाचे ठरेल.
चिकाटी
या सूत्राचा तिसरा भाग आहे चिकाटी. चिकाटी नसण्याच्या एका उदाहरणावरून सुरुवात करु या. तुम्हाला कोणी पाठदुखीचा आजार असलेले माहित आहे. त्यांचे एकमेव ध्येय आहे: त्यांना आपली पाठदुखी संपूर्ण नाहीशी करायची आहे किंवा कमीतकमी ते दुखणं खूपसं कमी करावयाचं आहे. त्यांच्या यासाठी असलेल्या योजनेत एका शारिरिक उपचारकर्त्याला नेमून तो व्यायाम करायला सांगेल हा एक भाग असेल. हे गृहस्थ महिनाभर व्यायाम करतात आणि थांबतात. त्यानंतर ते एका आयुर्वेदिक वैद्याकडे जातात. ते वैद्य त्यांना जडीबुटीच्या औषधांच्या मात्रा आणि पथ्य सांगतात. हे व्यायामापेक्षा सोपे असते, आणि हे गृहस्थ हे औषध दोन महिने घेतात आणि हळुहळु हा उपक्रम सोडून देतात. सहा महिन्यानंतर त्यांचे दुखणे तसेच असते तेव्हा ते आणखी दुसर्या वैद्याकडे वेगळा उपाय मिळविण्यासाठी जातात. हा मानवाचा स्वभाव आहे. आपल्या डोळ्यासमोर उपाय असतो, पण तो आपण अमलांत आणत नाही. आपण आपला धीर सोडतो आणि दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपले धेय प्राप्त करत नाही, आपण एका उपायावरून दुसर्या उपायावर उड्या मारत राहिलो तर आपली पाठदुखी जात नाही यात काहीच आश्चर्य नाही.
आपली योजना जर नीट काम करत नसेल तर अर्थातच ती बदलण्याची कधीकधी गरज असते. यावर गुरुदेवांनी लिहिले आहे: चंचलता म्हणजे निर्णय न घेणे. बदलत्या परिस्थितीमुळे आपला मतपरिवर्तन करणार्या आणि निर्णय न घेऊ शकणार्या व्यक्तीमध्ये काय फरक आहे हे आपण कसे जाणून घ्यावे? चंचल व्यक्ति चपलवृत्तीची आणि स्वतःबद्दल खात्री नसलेली असते, कारणाशिवाय किंवा उद्देशाशिवाय स्वतःचे मन बदलत असते. चिकाटी हे अशा मनाचे वर्णन आहे की जे नवीन माहिती प्राप्त झाल्यावर परिपक्व कारणांमुळे आपल्या मनांत बदल करण्यास तयार असते, परन्तु, अशा योग्य कारणांच्या अभावात कठीण परिस्थितीतही निश्चयाने स्थिर असते. हा निर्णय शहाणपणाच्या विवेकी बुद्धीवर आधारित असतो. एक भक्कम निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर पुनर्विचार नवीन माहिती मिळाल्यानंतरच करावयाचा.
चिकाटी किंवा एखाद्या कार्यात मग्न राहण्याची प्रवृत्ति अडचणींवर मात करण्यासाठी महत्वाची आहे. आपली एक उत्तम योजना आहे, एक स्पष्ट धेय आहे, आपण प्रगति करत आहोत, आणि आपण एका मोठ्या अडचणीत सापडतो. हिंदु जगतात अशा वेळी असा विचार करतात की “परमेश्वर श्री गणेश माझ्या योजनेत अटकाव घालत आहे. मी हे करायला नको,” आणि आपण थांबतो. अडचण आली की आपली योजना सोडून द्यावी असे नाही. काही अडचणींवर मात करणेच उत्तम असते आणि काहींचे श्री गणेशाच्या मार्गदर्शनाने काळजीपूर्वक पृथःकरण करणे आवश्यक असते. अंतर्ज्ञान आपल्याला यातून काय निवडावे याबद्दल मार्ग दाखवेल. कधीकधी समस्या ही असते की आपण केवळ अवास्तववादी असतो. मी एक मुद्दा नेहमी मांडत असतो की जेवढा मोठा प्रकल्प असतो तेवढ्या मोठ्या अडचणींची अपेक्षा करा. हाताने कोरलेल्या ग्रावा (granite) दगडाचा वापर करून हवाईचे मंदीर बांधतांना आमच्या आश्रमाला किती अडचणी आल्या असतील? असंख्य! चिकाटीने प्रत्येक अडचणीवर मात करण्यात आली. म्हणून, एकदा तुम्ही एक स्पष्ट ध्येय निर्माण केले आणि एक सज्ञान योजना केली की या प्रकल्पात किती अडचणी येऊ शकतील त्याचा हा प्रकल्प सुरु करण्यापूर्वी वास्तववादी पध्दतीने विचार करा. तेव्हा, जेव्हा तुमच्या प्रकल्पात अडचणी येतील तेव्हा तुम्ही निराश न होता स्मीतहास्य कराल. तुम्ही म्हणाल: “हे विघ्न क्रमांक एक, तू उपस्थित झाला. सुस्वागतम्. आम्हाला सुरुवात करून तीनचार महिने झाले. ठीक आहे.” तुम्हाला आश्चर्य वाटत नाही किंवा तुमचा उत्साहभंग होत नाही.
इच्छाशक्ति
गुरुदेवांच्या सूत्रातील शेवटची कल्पना आहे ती “इच्छाशक्ति”. कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःच्या आत्मशक्तीने पुढे जाणे, आणि प्राप्त करून घेणे. ही इच्छाशक्ति नसण्याचे एक उदाहरण आहे ते एका विद्यार्थ्याचे, ज्याला शाळेत उत्तम काम करायचं आहे, जो सकाळी लवकर उठायचं ठरवतो आणि खूप अभ्यास करायचं ठरवतो, परन्तु नियमीतपणे झोपतो. परिणाम? तो शाळेत चमकत नाही. योजना आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ति नाही. इच्छाशक्तीची स्नायूंशी तुलना करता येते. स्नायू अतीशय कुतुहूलजनक असतात. स्नाय़ूचा जेवढा उपयोग करण्यात येतो तेवढा तो अधिक सशक्त बनतो. बहुतेक सर्व गोष्टी त्यांचा वापर केल्यास त्या संपून जातात. एक तांदळाची बरणी घ्या. त्यातले तांदुळ वापरले तर तुमच्यासाठी रिकामी बरणी उरते. पैसे: बॅंकेत तुमचे पैसे आहेत, ते तुम्ही वापरता आणि तुमचं खातं रिकामं होतं. परन्तु इच्छाशक्ति याच्या विरुध्द आहे. तुम्ही ती जितकी वापरता तेवढी जास्त ती तुमच्याजवळ असते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या स्नायूला जेवढा व्यायाम करवाल, तेवढा तो अधिक शक्तिवान बनतो, आणि अधिक काम करू शकतो. म्ह्णून तुम्हाला हे नक्की करावयाचे असते की तुम्ही तुमची इच्छाशक्ति पुरेशी वापरत असता. सुदैवाने दिवसभ्ररात आपल्याला अनेक संधि मिळतात. गुरुदेव यासाठी स्पष्ट मार्गदर्शन करतात: आपले प्रत्येक काम पूर्ण करा, आणि आपल्या उत्तमोत्तम सामर्थ्याने, किंवा त्याहूनही थोडे चांगलेच. त्याने तुमची इच्छाशक्ति दृढ होते.
प्रार्थना-
(भाषांतरकाराची टीप: हा मूळ अग्रलेख इंग्रजी भाषेत असल्यामुळे या हे चारही शब्द p या व्यंजनाने सुरु होतात. गुरुदेव वैलाणस्वामी म्हणतात की हा पाचवा शब्द prayer गुरुदेव शिवाय शुभ्रमुनीयस्वामी यांनी त्यांच्या काही लेखांत वापरला आहे.) आणि पाचवा शब्द आहे प्रार्थना. “तुमच्या सज्ञान योजनेचा प्रारंभ नक्की प्रार्थनेनेच करा.” दुसर्या शब्दांत सांगयचे झाले तर, मंदिरात जा, तेथे श्री गणेशाची अर्चना करवून घ्या. आणि कुठलेही महत्वाचे कार्य शुभ दिवशी सुरु केलेले चांगले असते. हिंदु ज्योतिषशास्त्र नवीन प्रकल्प सुरु करायला कुठले दिवस शुभ आणि कुठले दिवस अशुभ आहेत याबद्दल माहिती देऊ शकते.
एक स्पष्ट उद्देश, एक सज्ञान योजना, चिकाटी आणि इच्छाशक्ति यांनी प्रार्थनेद्वारे सुरु केलेले प्रकल्प हे तुमच्या आयुष्यातील महत्वाचे ध्येय प्राप्त करून घेण्यात यशस्वी होण्यासाठी एक मोठा बलवान् संयोग आहे. सद्य सार्वदेशिक साथ या बाबतीत सकारात्मक विचार करायला भरपूर वेळ देत आहे.