आध्यात्मिक नेतृत्व करा

Read this article in:
English |
Spanish |
Hindi |
Gujarati |
Tamil |
Marathi

ऑगस्ट २८ – ३१, इसवी सन २००० मध्ये न्यूयॉर्क शहरांतील संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयांत सर्व जगतांतील अनेक श्रेष्ठ धार्मिक आणि आध्यात्मिक नेतृत्व असलेल्या दोन हजार लोकांचे एक संमेलन झाले. “धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांची सहस्रसंवत्सर विश्वशांति महासभा” या शीर्षकांखाली हे संमेलन झाले. “आजचा हिंदुधर्म”(Hinduism Today) या मासिकाचे संस्थापक सद्गुरु शिवाय शुभ्रमुनीयस्वामी हे हिंदु धर्माच्या प्रतिनिधींपैकी एक होते. एका त्यांनी संदेश दिला तो असा: “विश्वशांतिसाठी घरांतले युध्द थांबवा.” त्यांचे ते व्याख्यान नोव्हेंबर/डिसेंबर २००० च्या Hinduism Today च्या अंकात संपादकीय म्हणून प्रकाशित करण्यात आले:

“जगातील सर्व देशांत होत असलेल्या संग्रामांचे, वैपरित्यांचे, आणि हिंसाचारांचे प्रश्न मानवजात कसे योग्य प्रकारे सोडवू शकेल?” या प्रश्नाचे उत्तर मी असे दिले: आपण या सर्वांचे जे मूळ कारण आहे त्यावर उपाय करायला हवा. फक्त त्याच्या लक्षणांवर नव्हे. आयुर्वेदांत आपण तेच करतो, कारणांवर लक्ष केन्द्रित करून शरिराची नैसर्गिक समतोलता आणि आरोग्य स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे आपण नेहमी आजार आणि व्याधि यांवरच उपचार न करता एक आरोग्यपूर्ण शरिर, जे स्वतः व्याधींचे अपहरण करू शकेल असे शरीर स्थापित करण्यासाठी आपला वेळ आणि आपली साधने वापरतो. जगांतील युध्दे थांबवण्याचा सर्वोत्तम दीर्घकालीन मार्ग आपल्या घरांतील युध्द थांबवणे हाच होय. येथे द्वेष करणे सुरु होते, स्वतःपेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांबद्दल शत्रुत्वाच्या भावनांचे येथे पोषण होते, मारहाण झालेली मुले येथेच हिंसाचाराने आपले प्रश्न सोडवायला शिकतात.”

या सभेने मला धार्मिक आणि अध्यात्मिक नेत्यांमध्ये असलेल्या वस्तुभेदावर विचार करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यावरून माझे अनुमान असे निघाले की धार्मिक नेता हा एका प्रचलित धर्माचा नेता असतो. आध्यात्मिक नेता इतरांचे चित्त प्रसन्न करण्यात प्रवीण असतो. काही धार्मिक नेते आध्यात्मिक नेतेही असतात आणि काही नसतात. माझे गुरुदेव नक्कीच दोन्ही होते. वस्तुतः ते कुठल्याही धर्माच्या किंवा वंशपरंपरेच्या व्यक्तीचे चित्त प्रसन्न करण्यात प्रवीण होते. त्यांना हे कसे शक्य होते? प्रोत्साहनात्मक संभाषणाद्वारे. तुम्ही सुद्धा एक आध्यात्मिक नेता बनू शकाल. केवळ आपण भेटू त्या सर्वांशी काहीतरी प्रोत्साहनात्मक, प्रशस्तीपर, उदारचेतस् असे बोलण्याचे ठरवावे. त्यामुळे त्यांचा आणि आपला स्वतःचा दोघांचाही दिवस अधिक देदीप्यमान असा जाईल. कदाचित् केवळ त्यांना त्यांच्या विषण्ण मनाने सुरु झालेल्या सकाळपासून सुटका मिळून नवीन उत्साहाची प्राप्ति होण्यासाठी तुमच्या (प्रोत्साहनात्मक) शब्दांचीच गरज असावी. आध्यात्मिक नेते हे करतात, नाही काय? उत्साहवर्धन करणे, प्रसन्नता वाढवणे, जेणेकरून लोक आपल्या निध्यानाशी संपर्क साधून अत्युच्च मार्गावर क्रमण करायला प्रवृत्त होतील, हेच.

आपल्या परिचयातील लोकांची भेट होते तेव्हा तुम्ही त्यांच्या जीवनांतील एखाद्या स्थितीबद्दल विचारू शकता, उदाहरणार्थ, त्यांची अपत्ये, त्यांचा नुकताच झालेला प्रवास, आणि त्यांचा सामान्य सौख्याबद्दल तुमची उत्सुकता. गुरुदेव या प्रकारच्या समसुखदुःखित्वाची अनुभूति करण्यात प्रवीण होते. त्यामुळे काउआई बेटावरच्या सर्व स्तरावरच्या लोकांसाठी प्रसन्नतेचे आणि प्रोत्साहनाचे ते एक अत्यंत महत्वाचे साधन होते.

बैठकीत किंवा सभेत इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्युत्तम संधि मिळत असतात. प्रत्येकाच्या कल्पना लक्षपूर्वक ऎका आणि त्या योग्य असतील तर त्यांची जरूर प्रशंसा करा. जर कुणी आपली कल्पना प्रदर्शित करण्यास संकोच करत असेल तर त्या व्यक्तींसाठी प्रोत्साहनात्मक विचार व्यक्त करून त्यांचा आत्मविश्वास वाढवा. प्रत्येक बैठकीत स्वत:च्या उपस्थितीला आणि कल्पनांना प्राधान्य न देण्यासाठी स्वत:च्या मनावर संयम करा.

आध्यात्मिक नेतृत्व करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे लोकांनी केलेल्या मदतीबद्दल, मैत्रीबद्दल आणि तुमच्या जीवनांत उपस्थित असल्याबद्दल कृतज्ञता दाखवणे. जे पूर्णपणे कृतज्ञता दाखवतात त्यांना कशाचीही कमी पडत नाही. त्यांच्यात दैवी शक्तीचा वास असतो, जेणेकरून त्यांना सुखी होण्यासाठी आणखी कशाचीही आवश्यकता नसते आणि कशाचाही पश्चात्ताप करण्याची गरज नसते. त्यांचा आत्मा पूर्णत्वास पोचला असतो, त्यांचे जीवन कल्पनेपेक्षा समृद्ध असते. त्यामुळे साहाजिकच ते इतरांसाठी, ज्यांना स्वतःच्या जीवनांत पूर्णत्व आले आहे असे जाणवत नाही अशा लोकांसाठी, आध्यात्मिक नेते बनतात. कृतज्ञता हा सर्वसाधारण गुण आहे, पण आध्यात्मिक वृद्धीचा तो एक कषपाषाण आहे.

कृतज्ञता दाखवल्याने लॊकांनाही त्यांच्या जीवनातील पूर्णतेचा अनुभव येतो. त्याचा पहिला प्रकार म्हणजे स्मीतरूपाने सगळ्यांना नमस्कार करून “Good Morning, (afternoon, evening)”, असे म्हणून त्यांचे स्वागत करावे. आपले मन प्रसन्न ठेवल्याने आपल्या सभोवतालच्या सगळ्यांचे मन प्रसन्न राहते. आपल्या सुहृदय स्वभावामुळे त्यांनाही लोकांना स्नेहमय वागविण्याची जाणीव होत असते. तक्रारी व्यक्तीच्या अगदी विरुध्द व्हा.

दुर्दैवाने, सद्यपरिस्थितीत, एखादे उत्तम, प्रेमपूर्वक, किंवा मदतीचे कार्य केले तर त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते किंवा ते अपेक्षित असल्याचेच समजण्यात येते, हेच आपल्याला बहुतांशी आढळून येते. त्याची आनन्दाने नोंद घेण्यात येत नाही की त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत नाही. परन्तु त्यांत एखादी उणीव दिसून आली तर तत्पर, आणि अनेकदा अगदी दुष्टप्रकारे सर्व लोक तिकडे बोट दाखवतात!

आपली कृतज्ञता न दाखवण्याची काही सर्वसामान्य उदाहरणे बघू या: १) दोन शाळाकरी मुलांची आई, रोज त्यांच्यासाठी त्यांच्या घरच्या आणि शाळेच्या गरजा भागविण्यासाठी परिश्रम करते. ती मुले तिचे हे कष्ट हे तिचे कर्तव्यच आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि कधीही आईला गोड शब्दात धन्यवाद देत नाहीत. २) पत्नी आपल्या पतीच्या सेवेत दक्ष असते आणि त्याच्या व्यवसायांत त्याला सकार्य पाठिंबा देते. पति मात्र तिच्या दैनंदिन मदतीची काही नोंद घेत नाही. ३) पति आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम ठेवण्यासाठी अतोनात परिश्रम करतो, सुटीच्या दिवशी सुद्धा काम करून अधिक पैसा मिळवतो. त्याच्या या अश्रान्त परिश्रमांची त्याची पत्नि कधी नोंद घेत नाही आणि कृतज्ञता दाखवत नाही. ४) कचेरीतील अधिकारी आपल्या हाताखालच्या लोकांना त्यांच्या कामांत कौशल्य मिळविण्यास आणि त्यांची भरभराट होण्यास मदत करतो. पण त्यांपैकी एकही व्यक्ति त्या अधिका‍र्‍याला त्याच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता दाखवत नाही.

गुरुदेवांनी कृतज्ञता (gratitude) आणि जाण (appreciation) यांसाठी दोन साधना निर्माण केल्या आहेत. प्रथम कृतज्ञतेच्या साधनेची सिद्धी करून नंतर जाणिवेच्या साधनेची पूर्ति करावी. कृतज्ञतेची साधना करण्यासाठी एका कागदावर गेल्या पांच वर्षांत आपल्या आयुष्यांत घडलेल्या सर्व चांगल्या घटनांची यादी करावी. जशी स्मरणशक्ति उत्तेजित होते तशी या यादीची लांबी वाढत जाईल. गुरुदेव असे सुचवतात की जर तुम्हाला एकही गोष्ट आठवत नसेल तर “अनुभवाच्या या महासागरांत परिपक्व होत असलेला प्रकाशमय असा मी एक आत्मा आहे.” (I am a spiritual being of light maturing in the ocean of experience.) असे अनेकवार लिहा. याने तुमची स्मरणशक्ति उत्तम प्रेरित होईल आणि अधिक आठवणी येऊ लागतील. जाणिवेच्या या प्रेममय भावना ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या जीवनातील उत्तम काळांत मदत केली होती त्यांच्याकडे वाहू लागतील. अनुमोदनाच्या आणि क्षांतिच्या भावनाही या वेळेस उबाळून येण्याची शक्यता आहे. ही साधना “तिरुकुरल” या ग्रंथातील कृतज्ञता या विषयांवरील प्रकरणांतील हे नीतिवाक्य प्रतिबिंबित करते: “अनुग्रह विसरणे सर्वथा अयोग्य आहे, परन्तु अपकाराचे तत्काळ विस्मरण करणे योग्य आहे.”

आपल्या जीवनांतील उत्तम घटनांवर लक्ष केन्द्रित केल्याने साहाजिकच जाणिवेची साधना होते. ही साधना अशी: ज्या व्यक्तीला तुम्हाला कृतज्ञता प्रदर्शित करायची आहे, त्या व्यत्क्तीला सामोरासमोर जाऊन नजरेला नजर मिळवून तुम्हाला त्यांच्याबद्दल किती आदर आहे आणि तुम्हाला त्यांच्या मैत्रीची किती किंमत आहे ते स्पष्ट शब्दात सांगा. हे अत्यंत महत्वाचे आहे. फक्त “तुम्ही किती छान आहात” असे सर्वसामान्य विधान करू नका. किंबहुना, त्या व्यक्तीचे जे विशिष्ट गुण तुम्हाला आकर्षित करतात त्याबद्दल बोला, जेणेकरून त्या व्यक्तीला तुम्हाला त्यांच्याबद्दल खरोखर काय वाटते त्याची पूर्ण कल्पना येईल, केवळ “तोंडपुजेपणा” नको. तुमच्या सोज्वळ शब्दांनी आणि स्मीतपूर्वक मुखाने त्यांना खात्री करून द्या की तुम्ही हे सर्व खरोखर प्रामाणिकपणे म्हणत आहात.

जाणिवेच्या साधनेची तयारी करायला तुम्ही स्वतःवर प्रयोग करू शकता. एका आरशापुढे उभे राहा. स्वतःच्या नजरेला नजर भिडवून मोठ्याने म्हणा:”तू माझ्या जीवनांत आहे याची मला जाणिव आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.” त्यानंतर तुम्ही गेल्या पांच वर्षात केलेल्या काही सुकर्मांचे वर्णन करू शकता. एकदा स्वतःबद्दल जाणिव आणि कृतज्ञता व्यक्त करणे सोपे झाले की इतरांची जाणकारी करण्यास तयार आहात असे समजावे. ही तालीम तुमचा उरलेला लाजाळूपणा घालवण्यास मदत करते.

विशेष प्रसंग आपली जाणिव प्रदर्शित करावयास फारच उपयुक्त ठरतात. वाढदिवस, मातृदिन, पितृदिन, मातापितामहदिन हे दिवस सुध्दा यासाठी अत्युत्तम योग आहेत. ब‌‍र्‍याच देशांत तर वरिष्ठ अधिका‍र्‍यांसाठी देखील एक दिवस नियोजित केला असतो. काही वर्षांपूर्वी मलेशियातील काही तरुण भक्त मंडळींनी जाहिर न करता मातृदिन साजरा करावयाचे ठरविले. त्याबद्दल त्यांनी नंतर मला कळविले ते असॆ:”सर्वसामान्य सत्संगाच्या, भजन, ध्यान, इत्यादि कार्यक्रमांनंतर आम्ही अचानक प्रत्येक मातेला पुढे येऊन लोकांसमोर उभे राहायला सांगितले. तिच्या प्रत्येक मुलाने/मुलीने तिला हार घातला. तिला एक पुस्तकांत पान राखण्यासाठी एक चिन्ह (bookmark), एक अभिनंदनपत्र (greeting card), आणि गुलाबाचे एक सुबक पाकीट (हे सर्व आम्ही स्वतः तयार केलेले) भेट म्हणून दिले, सर्व आयांना साष्टांग प्रणिपात केला, आलिंगन दिले, आणि या दिवसासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ही वेळ येईपर्यंत जवळजवळ सर्व मातोश्री आपले आनन्दाश्रु पुसण्यात गुंतल्या होत्या.”

आपली जाण प्रदर्शित करण्याला पहिला अडथळा ही वस्तुस्थिति आहे की दुर्दैवाने इतर कुणीच हे करीत नाही. प्रथमच असे करायला थोडे अधिक धैर्य लागते. पुरुषांसाठी तर तत्कालीन संस्कृति तर असे प्रस्तुत करत असेल की पुरुष जाणिव प्रत्यक्षात दाखवत नसतात. त्या परिस्थितीत तर आणखी धैर्य लागते.

आपली जाण दाखविण्याचा एक थोडा कमी प्रत्यक्ष मार्ग आहे तो म्हणजे उपहाराबरोबर एक पत्र पाठविणे. तुम्ही स्वतः तयार केलेली उपहाराची वस्तु ही तुमच्या आस्थेचे आणि आर्जवाचे लक्षण असते.

माझ्या गुरुजींनी आम्हाला आपल्या कुटुम्बियांना, मित्रमंडळींना, आध्यात्मिक उपदेष्टय़ांना, सहकारी मंडळींना आणि समाजनेत्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा कृतज्ञता दाखविण्यासाठी प्रोत्साहन दिले. लक्षांत असू द्या की आपले प्रेम प्रसारित करतांना विशेष उल्लेख करा, चेह‌‍‌र्‍यावर स्मीत असू द्या, आणि हे ही की आपण जगताला बदलण्यासाठी मदत करत आहोत. ज्यांचे मन तुम्ही प्रसन्न कराल, ते तुमच्या कडून धडा शिकतील आणि इतरांना प्रसन्न करतील.

गुरुदेवांनी लिहिले: “आपण भौतिक शरीरांत वास्तव्य करणारा एक निर्मळ आत्मा आहोत. स्वेच्छेची मिळालेली दैवी देणगी प्रेमाचे आच्छादन करून आपण या जगतांत उत्तम बदल, अगदी थोड्या प्रमाणांत का होईना, करण्यसाठी वापरू शकतो, आणि वापरावी. आपण सर्वांनी केलेला हा बदल एकत्र मोठ्या प्रमाणावर होईल. शिष्य गुरूंना कृतज्ञ असावेत, पति त्यांच्या पत्नींना, पत्नि त्यांच्या पतींना, आईवडिल त्यांच्या अपत्यांना, अपत्ये त्यांच्या आईवडिलांना, विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना, आणि शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना. इतरांची प्रशंसा करणे आणि आपल्याजवळ जे नाही त्याची जाण ठेवणे हे अतिशय गुणकारक आहे!

Leave a Comment

Your name, email and comment may be published in Hinduism Today's "Letters" page in print and online. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top