Read this article in:
English |
Gujarati |
Hindi |
Marathi |
Russian |
Spanish |
Tamil

आपल्या हिंदुधर्माचा एक अनन्य पैलू हा आहे की प्रत्येक व्यक्ति स्वतः पुरोहित होऊ शकते आणि स्वतःच्या देवालयाची प्रमुख होऊ शकते. ते देवालय आहे तुमच्या घरांतील देवघर. रोज पूजा करुन तुम्ही त्याचे एका छोट्या मंदीरांत रुपांतर करू शकता किंवा पवित्रिकरण करू शकता. जर या देवालयासाठी वेगळी खोली, जेथे पूजा आणि ध्यान याच क्रिया होतात आणि जेथे ऎहिक जीवनावर गप्पा आणि इतर उद्योग होत नसतात, अशी असेल तर ही क्रिया उत्तमप्रकारे लागू पडते. ही एक आदर्श स्थिती. जेव्हा हे शक्य नसते तेव्हा कमीत कमी एखाद्या खोलीचा एक शांत कोपरा, एका फळीपेक्षा किंवा कपाटापेक्षा अधिक योग्य असा, वापरावा. कुटुंबातील सर्वांनाच ह्या देवघरांत आश्रय घेता येईल आणि तेथे त्यांना परमेश्वराशी सायुज्य स्थापन करता येईल आणि तेथे त्यांना परमेश्वरची स्तुति, प्रार्थना करता येईल आणि आपल्या व्यावहारिक गरजा देवापुढे मांडता येतील अशी जागा आहे, हे मात्र निश्चित करा.

कांचीपुरम कामकोटी पीठाच्या स्वर्गीय श्री श्री श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वति महा स्वामीजींनी घरच्या पूजेच्या आवश्यकतेबद्दल असे विधान केले होते: “प्रत्येक कुटुंबाने ईश्वराची पूजा केलीच पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी योग्य ती दीक्षा घेऊन व्यवस्थित (सांग्रसंगीत) पूजा करावी. इतरांनी फक्त एक संक्षिप्त, दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही अशी पूजा करावी. कचेरींत कामाला जाणाऱ्या लोकांनी कमीत कमी ही छोटी पूजा करावी. सर्व घरांत पवित्र घंटानाद झालाच पाहिजे.”

आपल्या घरांतल्या देवघरांत पूजा करण्याचा आपला प्रयत्न अगदी सोप्या प्रकारे सुरु होऊन हळुवार अधिक व्यवस्थित होऊ लागेल याची एक कथा ऎका. शेखर कुटुंबाच्या घरांत नेहमीच एक देवघर होते. वर्षानुवर्षे हेतुपूर्वक अभ्यास करून शेखर कुटुंबतील पतीने पूजा करण्याचे अधिकाधिक ज्ञान मिळविले. सुरुवातीला ते केवळ उदबत्ती ओवाळून एक सोपा गणपती मंत्र म्हणायचे. नंतर त्यांनी आत्मार्थ पूजा शिकून घेतली. ते रोज सकाळी न्याहारीच्या आधी ही पूजा करतात. ही पूर्ण पूजा करणे त्यांना अत्यंत समाधानकारक वाटते आणि सर्व कुटुम्बियांना त्यामुळे प्रसन्नता मिळते असेही त्यांना दिसून आले. (गणेश आत्मार्थ पूजेची लेखी प्रत आणि ध्वनीमुद्रित प्रत www.himalayanacademy.com/audio/chants/ganesha_puja/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.)

वैयक्तिक पूजेबद्दल:

बहुजनांना याची जाणिव होत नाही, परन्तु वैयक्तिक पूजा ही हिंदुधर्मांत, ज्याला आपण यम आणि नियम म्हणतो, त्या हिंदुधर्माच्या आचरणसंहितेचे मूलभूत अंग आहे. अष्टांगयोगाची पहिली आणि दुसरी पायरी असलेली ही आचरणसंहिता नेहमीच ध्यानसाधनेचा पाया समजली जाते. दहा नियमांपैकी एक, पूजा, हा ईश्वरपूजन म्हणून ओळखला जातो. आपण स्वतःसाठी करतो ती पूजा, ब्राह्मणाने आपल्यासाठी केलेल्या पूजेऎवजी, यांत विवेचित आहे. आपल्या घरांतल्या देवघरांत केलेल्या या पूजेत केवळ एक फूल अर्पण करून केलेल्या संक्षिप्त पूजेपासून एक पूर्ण औपचारिक पूजा, या सर्वांचा त्यांत समावेश होतो. सर्वसामान्य व्यक्तीने केलेली पूजा, ज्या पूजेला आत्मार्थ पूजा म्हणतात, ती वैयक्तिक पूजाविधी समजण्यात येते. आणि मंदिरांत पुजाऱ्याने केलेल्या सार्वजनिक पूजेला परार्थ पूजा अशी संज्ञा आहे. आत्मार्थ पूजा पूर्ण झाल्यानंतर काही वेळ ध्यान करून मानसिक पूजा करून पूजेने निर्माण केलेला आणि देवघरांत यद्यपि उपस्थित असलेला “प्राण” आत्मसात करून घेण्याची प्रथा आहे. याप्रमाणे पूजेचे अत्यधिक फल मिळते.

माझ्या गुरुदेवांनी असे अवलोकित केले की काही लोक पूजा करायला घाबरतात. असे कां? पुष्कळदा त्यांना असे वाटते की त्यांना पुरेसे शिक्षण नसते किंवा त्या पूजेच्या सिध्दसाधनेच्या पार्श्वभूमीचे पुरेसे ज्ञान नसते. अनेक हिंदु लोक पूजा आणि संस्कार विधींसाठी पुरोहितांवर पूर्णपणे अवलंबून असतात. तथापि, गुरुदेव आणि कांचीपुरमचे महा स्वामीजी, दोघेही हे सुचवतात की देवदेवतांची कृपा मिळविण्यासाठी साधी पूजा कुणीही करू शकतो. ज्यांना उच्चस्थरांवरील आत्मार्थ पूजा करायची इच्छाअसेल त्यांनी योग्य पुरोहितांकडून दीक्षा घ्यावी.

गुरुदेवांनी आत्मार्थ पूजा करण्यासाठी एक महत्वाचे बंधन घातले. ते असे: जर मनांत क्रोधभाव तीव्रतेने जाणवत असेल तर एकतीस दिवस पूजा करु नये. साध्या उदबत्तीने देवाच्या मूर्तींना ओवाळले किंवा ॐ सारख्या सोप्या मंत्राचा जप केला तर चालेल, परन्तु आरती करू नये, घंटा वाजवू नये किंवा कुठल्याही मंत्राचा जप करु नये.

त्यांनी हे बंधन घालायचे कारण हे की त्यांना ज्ञात होते की क्रोधग्रस्त व्यक्ति दुसऱ्या विश्वात आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या देवतांऎवजी राक्षसांना आव्हान देईल. वस्तुस्थिति अशी आहे की आपल्या घरांत पारमार्थिक वातावरण निर्माण करायचे असेल तर आपल्या क्रोधभावना आणि त्याचप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या भाषेचे प्रमाण शक्य तेवढे कमी करयला हवे. अनेक भाग केलेल्या एका क्लिष्ट कोड्याचे उदाहरण घ्या. पूजा करणे म्हणजे त्या कोड्याचे दहा तुकडे बरोबर बसवणे. स्वल्प संताप त्यातले पांच तुकडे काढून घेतो, साधी वाईट भाषा दोन आणि एक मोठा वादविवाद त्यातले वीस तुकडे काढून घेतो. उघड आहे की आपण आपला संताप आणि आपली भाषा यावर संयम केला नाही तर हे कोडे आपण कधीच पूर्ण सोडवू शकणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे आपण आपल्या क्रोधाला आणि अर्वाच्य शब्दांना निष्प्रभ केल्याशिवाय आपले अत्यंत प्रामाणिक प्रयत्न देखील आपल्या घरांत पारमार्थिक वातावरण निर्माण करण्यात यशस्वी होणार नाहीत.

संपर्क ठेवणे:

सर्व हिंदुधर्मीय लोकांचे संरक्षण करण्यासाठी, आणि त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी अंतरलोकांत देवदेवता वास्तव्य करीत असतात. देवघर हे या पिढ्यान्‌पिढ्या या कुटुम्बाच्या संरक्षणची जबाबदारी स्वतःवर घेतलेल्या या अदृश्य अतिथींचे हे स्थान असते. या खोलीत सर्व कुटुम्बीय प्रवेश करून, बसून या सुसंस्कृत जीवांशी सायुज्य करू शकतात. “शयनगृहांत, एखाद्या कपाटांत किंवा स्वयंपाकघराच्या एखाद्या कोपऱ्यांत असलेल्या देवघरांत या देवतांना आकर्षित करता येत नाही”, असे गुरुदेव सांगतात. “आपण माननीय पाहुण्याची घरातल्या कपाटांत राहण्याची सोय केली आणि त्याची स्वयंपाकघरांत झोपायची सोय केली तर त्याला त्याचे स्वागत केल्यासारखे, त्यांचा सन्मान केल्यासारखे आणि त्यांच्यावर प्रेम केल्यासारखे त्यांना मूळीच वाटणार नाही.”

देवघर हे अत्यंत सुसंस्कृत हिंदु कुटुंबाच्या घराचे केन्द्र असते. हे विशिष्ट कक्ष वेगळे ठेवून त्यांत देवालयासारखे वातावरण स्थापित केलेले असते. येथे आपण पूजा करतो, धर्मग्रंथांचे पठन करतो, साधना करतो, भजनं गातो, आणि जपजाप्य करतो. ही पवित्र जागा एक एकान्तिक आश्रयाची आणि ध्यानसाधनेची जागा होते. या खोलीत आपण या जगतांपासून निवृत्त होऊन अंतर्मुख होऊन आपल्या कारण चित्ताच्या निध्यानाशी संपर्क साधू शकतो. ही जागा आपण स्वतःला तोंड देण्याचे, आपले कर्म स्विकारण्याचे आणि भस्मसात करण्याचे आणि नवीन निर्णय घेण्याचे स्थान असते. आपले संरक्षण करणाऱ्या देवदेवतांच्या मदतीने व अन्तर्ज्ञानाने आपल्या प्रश्नांचे निरसन करण्याचे हे स्थान असते.

आपल्या घरांतील देवघराच्या अस्तित्वाचे स्पन्दन आपण नियमीत देवळांत जाऊन, आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी जाऊन आणि उत्सवप्रसंगी जाऊन, अधिक बलशाली करू शकतो. देवळांतून परत घरी आल्यानंतर देवघरांत दिवा लावण्याने देवळांतले धार्मिक वातावरण आपल्या घरांत निर्माण होते. देवासमोर दिवा लावण्याची ही साधी क्रिया अद्भुतपणे देवळांतल्या देवदेवतांना आपल्या घरांतील देवघरांत आणते. अंतरलोकांतून ते सर्व कुटुम्बियांना आशीर्वाद देतात आणि घरातल्या धार्मिक शक्तीची अभिवृद्धि करतात.

गुरुदेव घरांत देवदेवतांचे स्थान असलेले वेगळे देवघर असण्याची ही कल्पना आणखी एक पाऊल पुढे घेऊन जातात. ते असे म्हणतात की सुसंकृत, देवभक्त हिंदु कुटुंब आपले पूर्ण घरच देवाला अर्पित करते. “ईश्वर्पूजनाची आदर्श कल्पना हीच की आपण सदैव ईश्वराच्या सान्निध्यात ईश्वराच्याच घरांत, जे आपलेही घर आहे त्या घरंत राहतो आणि नियमीत देवलयांत देवदर्शनासाठी जातो. आपल्या अन्तःकरणातल्या देवाच्या जाणिव होण्याचा प्रयत्नाचा पायवा याप्रमाणे टाकण्यात येतो. जो देवाचा सांगाति म्हणून देवाबरोबर देवाच्या घरी राहत नाही त्याला स्वतःच्या आत्म्यातल्या देव प्राप्त होणे कसे शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. केवळ अहंकारावर आधारित असा आहार्य अधिकरण होईल.

आपल्या घरांत परमेश्वराचे अस्तित्व मानणारे हिंदु जन साहाजिकच त्याचा सन्मान करण्याची आणि त्याला नैवेद्य दाखवण्याची इच्छा करतात. ते प्रेमाने त्याच्या छायाचित्रापुढे नैवेद्याचे ताट ठेवतात, खोलीचे दार बंद करून बाहेर जातात. देव त्या नैवेद्याचा आस्वाद घेतात. गुरुदेव म्हणतात: देवदेवता खरोखर त्या अन्नाचा आस्वाद घेऊन आनन्दित होतात; ते त्या अन्नातील शक्ति शोषित करून घेतात. सर्वांचे भोजन झाल्यानंतर देवांची ही ताटे उचलण्यात येतात. देवांच्या ताटांत उरलेले अन्न देवांनी आशीर्वाद दिलेला प्रसाद म्हणून भक्षण करण्यात येते. घरांतल्या अत्यंत बुभुक्षित व्यक्तीसारखे व्यवस्थित देवाला अन्न वाढण्यात येते, केवळ औपचारिक नैवेद्य नाही. अर्थातच, देवदेवता सदैव केवळ देवघरांतच राहतात असे नाही. ते स्वतंत्रपणे पूर्ण घरांत घरांतील सर्व मंडळी, अतिथी आणि आप्तेष्ट यांची संभाषणे ऎकत आणि त्यांचे निरिक्षण करत वावरत असतात. हे कुटुम्ब देवाच्या घरांत राहत असल्यामुळे आणि देव त्यांच्या घरांत न राहत असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणी परमेश्वराचाच आवाज ऎकू येतो.

गुरुदेव आम्हा सर्वांना असे आव्हान देतात: मानसशास्त्रीय, निर्णयात्मक आणि धार्मिक दृष्ट्या प्रश्न हा आहे: “आपण परमेश्वराबरोबर राहतो की देव अधूनमधून आपल्याल भेट देतो? घरांत अधिकारित्व कुणाचे आहे, एका अधर्मी,अज्ञानी, वर्चस्व गाजवणाऱ्या व्यक्तीचे, की स्वतः परमेश्वराचे, ज्याला घरांतील थोर मंडळीसकट पूर्ण कुटुम्ब, ज्यांनी आपण परमेश्वराच्या घरी राहतो अशी वस्तुस्थिति स्विकारलेली आहे असे लोक वंदन करतात, त्याचे? हाच धर्म. हेच ईश्वरपूजन.”