Read this article in:
English |
Gujarati |
Hindi |
Marathi |
Russian |
Spanish |
Tamil

आपले आध्यात्मिक जीवन आपल्या ऎहिक जीवनापासून वेगळे नसते, ते केवळ आपले अत्युकृष्ट जीवन असते. कल्पना करा की एका स्त्रीने असे ऎकले की रामकृष्णांना देवाचे दर्शन झाले, अगदी आपल्या हातांत असलेल्या एका सफरचंदासारखे स्पष्ट, किंवा एखादा मनुष्य थोर योगी लोकांबद्दल ऎकतो की त्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकणा‍र्‍या प्रकाशाच्या प्रपातांत सत्याचे ज्ञान झाल्याने सर्व अस्तित्वाच्या एकात्मतेची जाणीव झाली. हे ऎकून ती स्त्री किंवा तो पुरुष कदाचित् आपण एखाद्या वृक्षाखाली किंवा एखाद्या गुहेत ध्यान करावे असे ठरवतील. किवा बरेच दिवस ते उपवास करतील, अवघड यात्रेला जातील आणि चमत्कारिक मन्त्रांचा तासन् तास जप करतील. आत्मज्ञान मिळविण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळेल असे आपणांस वाटते काय़?… अनुभव असे दाखवतो की बहुतेक नाही.

आपले वास्तव जीवन त्यांच्या या मार्गक्रमणाची प्रेरणा सुचवते. समजा कोणी एखाद्या जगातील सर्वश्रेष्ठ वादकाच्या पियानो वादनाच्या कार्यक्रमाला जातो. मन हरपून जाईल एवढे अप्रतिम संगीत त्याला ऎकायला मिळते. कलाकाराचे नैपुण्य निष्कलंक, उत्क्रमणीय, आणि परिपूर्ण असते. ते ऎकून आपला श्रोता ठरवतो: “हाच माझा मार्ग आहे. मला हेच करायचे.” तो पियानो वाजवायला बसतो, त्या निपुण कलाकाराचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो, परन्तु सुमधुर संगीत मात्र निर्माण होत नाही. कितीहि तांस किंवा कितीहि प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी त्या संगीताच्या कार्यक्रमांत ऎकलेले संगीत तो प्राप्त करू शकत नाही.

कां बरे? कारण त्या स्तरावरचे नैपुण्य साधायला लागणा‍र्‍या कष्टाची त्याला जाणिव नसते. यशस्वी होण्यासाठी कुठल्याही मार्गाच्या प्रारंभापासूनच सुरुवात करणे अत्यावश्यक आहे, मधूनच किंवा शेवटी नव्हे. आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर मूलतत्वे वगळून आपल्या प्रयत्नांना चिरस्थायी फल प्राप्त होणार नाही. पियानो वादकासाठी मूलतत्त्वे आहेत: संगीतशास्त्र, स्नायूंचे शिक्षण आणि व्यायाम, स्मरणशक्तिची वृद्धि करणॆ, संगीतविवरण करु शकेल अशा रसज्ञ श्रवणशक्तिची वृद्धी करणॆ आणि नियमाने अभ्यास, अभ्यास, अभ्यास. आध्यामिक जीवनापासून हे काही वेगळे नाही. थोर विभूति एका गुहेत बसले आणि त्यांना ज्ञान मिळाले असे झाले नाही. त्यांनी वर्षानुवर्ष स्वत:प्रयत्न केले. त्यांनी साधना केली, आपल्या सवयी बदलल्या, आपल्या वासना बदलल्या, आपल्या प्रतिक्रिया बदलल्या, आपले खुद्द चरित्र बदलले. त्यांनी जे प्राप्त केले ते आपल्याला हवे असेल तर आपणही तेच करायला हवे. आपणही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.

आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा आपले चारित्र्य हा एक मूलभूत पाया आहे. चारित्र्य म्हणजे नेमके काय आहे? चारित्र्य हे प्रत्येकाच्या आपल्या मानसिक आणि नैतिक गुणांचा विशेष वैयक्तिक संचय आहे. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी यांनी असे अवलोकन केले आहे की:

“सत्यानंद ध्यानामुळे प्राप्त होतो हे सत्य आहे, आणि उच्च स्तरांवरील चैतन्य हा मानवाचा वारसा आहे हे ही सत्य आहे. तथापि, दहा यम आणि त्यांना अनुसरून दहा नियम यांची आपल्या सत्यानंदाची चेतना कायम राखण्यासाठी आवश्यकता आहे. त्याचप्रमाणॆ कुठल्याही जन्मांत आपल्या स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल उत्तम भावना असणेही आवश्यक आहे. हे यम आणि नियम आपले चारित्र्य घडवतात. चारित्र्य हे आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे. वस्तुस्थिति ही आहे की, जेवढे आपण उच्च स्तरावर पोहोचू, तेवढेच आपण अधोगतीला जाणे शक्य आहे. आपल्या शरीरांतील वरची चक्रे गतीने फिरत असतात, तर खालची चक्रे अधिक गतीने भ्रमण करीत असतात. अध्यात्म मार्गावर चिकाटीने प्रगती करण्यासाठी आवश्यक असणा‍री संतुष्ट वृत्ति कायम करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित केलाच पाहिजे. या थोर ऋषींनी मानवी स्वभावाच्या दुर्बलतेचे अवलोकन केले आणि त्यांनी आपला स्वभावधर्म सुदृढ करण्यासाठी हे मार्गदर्शन किंवा हे नियम आपणास पालन करावयास दिले. ते म्हणाले: “प्रयत्न करा! दुस‍र्यांना न दुखवण्याचा, सत्यवचनी असण्याचा आणि त्यांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचा चिकाटीने प्रयत्न करु या.”

चिन्मय मिशनचे संस्थापक, स्वामी चिन्मयानन्द, यांनी चारित्र्याच्या परिवर्तनाचा आणि आध्यात्मिक वृद्धीचा सरळ संबंध प्रदर्शित केला आहे: “आपण आपले जीवन आपली सूप्त शक्ति (आध्यात्मिक) शोधण्याच्या उद्देशाने रचिले आणि आपण आपली वर्तणुक त्या सूप्त शक्तीचे प्रतिपालन केले तर आपले जीवन योग्य प्रकारे निस्तिर्ण होते. आपले यश आपण आपल्या चारित्र्यात आणि वर्तणुकीत किती परिवर्तन करू शकतो यांवर अवलंबून असते.

माझ्या गुरूंनी समजाविले: चारित्र्य घडवायला, यमनियमांप्रमाणे वागायला, एखाद्याला याची जाणीव व्हायला हवी की केवळ उपजत गुणांप्रमाणे वागल्यामुळे त्याला पुन्हा मिळू नयेत असे वाटण्यासारखे अनुभव मिळाले. तेव्हा त्याला असे उमजते की त्याने यमनियमांचे पालन केले पाहिजे आणि पुन्हा ते परिणाम भोगावे लागू नयेत. या आध्यात्मिक मार्गाच्या पायाशिवाय या मार्गावर प्रगति होणे, फळ मिळणे शक्य नाही. यमनियमांवर आधारित योग्य वर्तणुकीचा पायवा न टाकता सर्वोच्च कोटीच्या साक्षात्कारांची अपेक्षा करणे म्हणजे मुळांपासून कापलेले एक लिंबाचे झाड एका बादलीत घालून त्याला फळ येण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे.

प्रत्येकाला बरेच स्वभावगुण असतात. स्वभावगुण ही एक सवय, एक सामान्य विचार करण्याची, बोलायची, वागायची पद्धत. बहुतेक सर्वांना या उत्कृष्ट (उत्साही, नियमीत,विश्वसनीय, दयाळु, प्रांजळ) आणि निकृष्ट (छद्मी, आळशी, मन्द, धूर्त) गुणांचे मिश्रण असते.

आपण या दुर्गणांबद्दल सर्वसामान्य कारण ऎकलं आहे:”मी तसांच. मी काय करू शकतो त्याबद्दल? मी केवळ आळशी आहे.” हिंदुधर्म आपल्याला हे शिकवतो की आपण जे चारित्र्य घेऊन जन्माला येतो ते आपल्या पूर्वजन्मांच्या सर्व कर्मांचे फळ आहे. काही लोक जन्मत:च स्पष्टपणे धार्मिक असतात, काही मिश्र स्वभावाचे असतात, तर इतर काही स्वार्थी आणि धूर्त असतात. तथापि, हिंदुधर्म हे ही शिकवतो की आपण आपले जन्मत: असलेले गुण आपल्या स्वयंचिंतनाने आणि स्वप्रयत्नाने, आपण कसे विचार करतो आणि कसे वागतो यांचे स्वयं अवलोकन करून आणि त्यांवर नियंत्रण करून बदलू शकतो. आपल्या ज्या गुणाची वृद्धी करण्याची आकांक्षा आहे त्या गुणाबद्दल चिंतन केले आणि तो गुण प्रदर्शित केला तर तो गुण अधिक दृढ होईल.

आपण आलस्यासारखा दुर्गुण बदलू शकतो ही कल्पना मान्य करणे ही पहिली पायरी आहे. जेव्हा हा दृष्टिकोन धारण करण्यात येतो, तेव्हा खालील चतुष्पदी उपक्रम सद्गुण प्राप्त करायला उपयोगी ठरतो:

  1. सद्गुण समजून घेणे
  2. त्याचे प्रदर्शन समजणे
  3. त्याच्या फायद्यांची जाणीव होणे
  4. त्याच्या प्रदर्शनाची सवय करणे

हा उपक्रम वापरतांना पतञ्जलि योगसूत्रातील हे तत्त्व लक्षांत असू द्यावे की अशा उपद्रवी विचारांना परास्त करण्यासाठी त्यांच्या विरुद्ध विचारांचे पोषण करावे. दुस‍र्‍यांना दुखवणे या सारखे उपद्रवी विचार-कुणाला दुःख दिलेले, त्यासाठी कारण झालेले किंवा त्याला संमति दिलेली असे असले तरी- मग ते विचार अभिलाषा, क्रोध, किंवा बुद्धिभ्रंशामुळे निर्माण झाले असले, ते अगदी मृदु, मध्यम किंवा तीव्र प्रमाणावर असले तरी, अज्ञान आणि क्लेशात त्याचे पर्यवसान होते. णून आपल्याला त्याच्या विरुध्द गुणांचे पोषण केले पाहिजे.

आता हा चतुष्पदी उपक्रमाने आलस्याचे कष्टाळू या गुणांत रुपांतर कसे करता येईल ते बघू.

प्रथम: हा सद्गुण समजून घ्या. जो गुण तुम्हाला प्राप्त करायचा आहे तो पूर्णपणे समजून घ्या. त्या गुणाचे आपल्या शब्दात वर्णन करणे हा यासाठी एक उत्तम मार्ग आहे. कष्टाळूपणा याचे आपण “मेहनती, म्हणजे कुठलाही प्रकल्प तासन् तास काम करून पूर्ण करण्याची तयारी असणे” अशी व्याख्या करू. त्याच्या विरुध्द गुण आळशीपणा, आलस्य, आहे कष्ट करण्याबाबतीत इच्छा नसणे, रिकामटेकडेपणा जास्त आवडणे. यानंतर यापैकी सद्गुणावर चिंतन करा.

द्वितीय: या गुणाचे प्रदर्शन ओळखा. ज्या लोकांमध्ये हा गुण आहे त्या लोकांचे विचार, त्यांची वक्तव्ये, त्यांची वृत्ति, त्यांची वर्तणुक यांची यादी करा. त्या बरोबरच त्याच्या विरुद्ध असलेल्या दुर्गुणाबद्दलही तशीच यादी करा.

उद्योगी आळशी
काम आत्ता करु काम पुढे ढकलू
काम पूर्ण करायला उशिरापर्यंत काम करु शक्यतितक्या लवकर थांबू
जितके जास्त काम थोड्या वेळात संपवू कमीत कमी कामांत निभवून नेऊ

तृतीय: त्याचे फायदे लक्ष्यात घ्या. त्या गुणामुळे होणार्‍या फायद्यांची यादी करा. त्यात या विरुध्द असलेल्या दुर्गुणामुळे येण्यार्‍या आपत्तींची जाणिव होते तिचाहि समावेश करा.

  • कष्टाळूपणा
  • आपल्या कुटुंबाची आणि समाजाची सेवा करण्यास अधिक सामर्थ्य
  • आपल्या व्यवसायांत प्रगति होण्यास संधि मिळणे
  • आपल्या सह्कार्‍याकडून कृतज्ञता
  • आत्मसन्मानाची वृद्धी
  • टीका टाळणे

आपले धर्मग्रंथ या बाबतीत अभिनिवेश करायला मदत करु शकतात. तिरुकुरल कष्टाळूपणावर फार महत्वाचे विचार प्रदर्शित करते: “सौभाग्य आपण स्वत: शोधून अविश्रांत शक्तीचा मनुष्य शोधते.” आळशीपणाबद्दल ते बजावणी देते: “दीर्घसूत्रत्व, विस्मृति, आलस्य, आणि निद्रा, हे चार गुण नाशाच्या दिशेने जाणार्‍या नावेचे रुप घेतात.”

चतुर्थ:त्या गुणाची सवय करा: ज्या कार्यामुळे हा गुण वृद्धित होईल अशी कार्ये नियमीत करण्याची सवय करा. त्यापासून होणार्‍या फायद्यांचे व्यवस्थित अवलोकन करा. आपला उद्देश वास्तवतेला धरून ठरवा. आपला उद्देश एवढा कठीण ठेवू नका, जेणेकरून तुम्ही तो पूर्णपणे साध्य करु शकणार नाही आणि त्यामुळे निराश होऊन तुम्ही प्रयत्न करणे सोडून द्याल. आपला कष्टाळूपणा वाढविण्यासाठी आपली कार्यक्षमता रोज पांच टक्के वाढवण्यावर आपले लक्ष्य केंद्रित करा. ते कार्य झपाट्याने करून, जास्त वेळ काम करून किंवा या दोहोंच्या मिश्र वापराने प्राप्त करता येते.

हळुहळु, चारित्र्यात बदल होईल आणि तुम्हाला निर्देशित करणारे लक्षणांचे परिवर्तन होईल. तुमच्या जीवनाला त्याने गाढ आध्यात्मिकता येईल आणि तुमचे भौतिक जीवन अधिक सुरक्षित होईल.
लक्ष्यांत असू द्या: कर्मावर विजय मिळविण्याची किल्ली आहे स्थैर्य.