हिंदु धर्माने अविश्वासाच्या कल्पनेला कधीच विरोध केला नाही, तथापि त्यातल्या परमेश्वराच्या गहन समजूतीमुळे नास्तिकता अधिक कठीण होते.
English |
Marathi |
Kannada |
Tamil |
Portuguese |
Spanish
Hindi
सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी
गेल्या अनेक वर्षांच्या माझ्या व्याख्य़ानांत आधुनिक विद्यापीठांत आपल्या हिंदु तरूण मंडळींवर धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव पडण्याच्या कल्पनेवर मी बोललो आहे. आश्चर्य हे आहे की जवळजवळ कुठल्याच आईवडिलांनी आणि शिक्षकांनी या मंदगतीने नाश करणार्या अद्भुततेबद्दल ऐकलेले नाही. मी समजावून सांगतो की विद्यापीठांच्या वातावरणांत बुध्दि आणि विज्ञान यांचे वर्चस्व असते आणि धर्म हा एक कमी महत्वाचा विषय म्हणून प्रस्तुत केला जातो. काही शिक्षक तर असा युक्तिवाद करतात की धर्माची कल्पना तिचा हेतु आता पूर्ण करून चुकली आहे आणि ती आता सोडून दिली पाहिजे. या बुध्दिवादी धर्मनिरपेक्षतेच्या वर्षानुवर्ष झालेल्या प्रभावामुळे आपण ज्या धर्मात वाढलो तो धर्म नाकारण्याचा प्रकार विश्वविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांत मोठ्य़ा प्रमाणात दिसतो. काही अपवाद सोडले तर हे सर्व धर्माच्या तरूण मंडळींना लागू पडते. ही नाकारण्याची क्रिया अनेक प्रकारे होते. तिचे तीन मुख्य प्रकार आहेत: १) नास्तिकतेच्या पायावर बसलेल्या धर्माचा स्विकार करणे, २) धर्मनिरपेक्ष मानवतावादाचा स्विकार करणे, आणि ३) आध्यात्मिक पण धार्मिक नाही असे होणे. “आध्यात्मिक पण धार्मिक नाही” आणि धर्मनिरपेक्ष मानवतावाद या पूर्वीच्या “प्रकाशकाच्या पीठावरून” प्रकाशित केलेल्या आहेत. येथे आपण नास्तिकतेच्या विषयाचे परिक्षण करू.
मला स्वतःला असे हिंदु कुटुम्ब माहित आहेत की ज्यांचा मुलगा किंवा मुलगी विश्वविद्यालयाचे शिक्षण संपवून घरी परत आला (आली) आणि आईवडिलांसमोर त्याने असे वक्तव्य केले: “विद्यापीठात मला वैज्ञानिक पध्दतीवर विश्वास ठेवायला शिकविण्यात आले, असे की सर्व काही सिध्द करता यायला पाहिजे. परमेश्वराच्या अस्तित्व सिध्द झालेले नाही. म्हणून माझा यापुढे देवावर विश्वास नाही. मी नास्तिक आहे.” बहुतेक सर्वच मातापित्यांना असे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो, आणि काय म्हणावे आणि काय करावे ते त्यांना सुचत नाही.
आईवडिलांना माझा असा सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या अपत्त्याची ही नव्याने शोधलेली भूमिका मान्य करावी. आणि नंतर काही कालावधीने हिंदु धर्मात परमेश्वराचे रूप हे पाश्चात्य धर्मापेक्षा, ज्यात नास्तिकतेचे मूळ आहे, त्यापेक्षा अधिक व्यापक आणि अचंबित करणारे आहे असे समजावून देण्याची संधि शोधावी. असे समजावून द्यावे की जेव्हा बहुतेक लोक परमेश्वराचा विचार करतात तेव्हा ते त्याचा किंवा तिचा एक व्यक्ति असा विचार करतात. अनेक अध्यापकांचे हेच मत आहे. परन्तु, हिंदु आणि इतर पौरस्त्य धर्मात परमेश्वर हा एक सर्वव्यापि चैतन्य आणि त्या चैतन्याचा सर्वश्रेष्ठ स्रोत आहे.
माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनीयस्वामी, यांनी या देवत्वाच्या तीन अंगांचे असे वर्णन केले: १)परमेश्वराचे अव्यक्त रूप हे कालातीत, आकारातीत आणि आकाशातीत आहे. २) परमेश्वर सर्व जीवांचा आद्य पदार्थ आणि त्यांतून प्रवाहित असलेले पवित्र चैतन्य आहे. ३) आणि परमेश्वर हा सर्वव्यापि आत्मा आहे जो निर्मिति, संवर्धन, विनाश, आच्छादन, आणि प्रदर्शन या पांच दैवी क्रिया करतो. परमेश्वर जरी एकमेव आणि पवित्र रहस्य असला तरी आपण त्याला या तीन पूर्णत्वातून समजून घेतो. याप्रमाणे परमेश्वर एका वैयक्तिक स्वामीपेक्षा अधिक आहे.
तुमच्या अपत्याने नव्याने शोधलेल्या नास्तिकतेला उत्तर देण्याचा दुसरा टप्पा आहे देवत्वाला वैयक्तिक पातळीवर आणणे. आपण असे म्हणू शकतो: “जरा विचित्र वाटेल, परन्तु व्यैयक्तिक देवावर विश्वास न ठेवता तुम्हाला हिंदु धर्माचे पालन करता येते. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास असावा लागतो. स्वतःला प्रश्न विवारा: “माझे अस्तित्व आहे काय?” या प्रश्नाचे उत्तर अर्थातच होकारार्थी आहे. हिंदु विचारसरणीत स्वतःच्या अस्तित्वावर आणि त्याच्या स्वरूपावर चित्त केन्द्रित करण्याला “आत्मबोध” म्हणतात. स्वतःला दुसरा प्रश्न विचारायचा तो: मला याची जाणीव आहे कां की मी आपल्या चैतन्याच्या विविध स्थितींचा अनुभव घेतो?- आत्मविश्वासासारख्या सकारात्मक आणि न्य़ूनभाव, भय, क्रोध, चिंता या सारख्या नकारात्मक? कदाचित् सुदैवाने तुम्हाला एका कल्पकतेच्या स्थितीचा अनुभव येऊ शकेल ज्या स्थितीत तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करू शकाल- एक शोध, एक कविता किंवा गीत. पुन्हा, साहाजिक उत्तर होकारार्थीच आहे.
या जागृतीच्या अवस्था म्हणजे एक पार्याचे उष्णतामापक असल्याची कल्पना करा, ज्यात निर्मितीक्षमता असलेल्या अवस्था वर आणि नकारात्मक अवस्था खाली आहेत असे. आत्मबोधाच्या मार्गाचे ध्येय हे आहे की त्या पार्याचे नियंत्रण असे करायचे की जेणेकरून आपली जाणीव नेहमी वरच राहील. जेव्हा आपण असे करण्यात कुशल होतो तेव्हा त्या तापमापकाचे सर्वोच्च स्थान आपल्या पोहोचेत येईल. ते एक दैवी, सर्वव्यापी संज्ञान आहे. असे आढळून येते की हे संज्ञान आपल्या सर्वात आहे, होय, परमेश्वरातसुध्दा. खरे तर, याचेच देव म्हणून वर्णन करण्यात येते.
देवत्वाकडे जाण्याच्या या मार्गाला हिंदु धर्मात “अद्वैत” म्हणतात, म्हणजे, भेदाचा अभाव, किंवा “एकवाद.” सर्वव्यापी जागृतीला संस्कृत भाषेत “सच्चिदानंद” म्हणतात, ज्याचा शब्दशः अर्थ आहे “अस्तित्व-जागृति-आनंद.”
माझ्या गुरुदेवांनी त्याचे हे वर्णन दिले: “सच्चिदानंद भगवान शिवाचे दैवी अंतःकरण आहे आणि तसेच प्रत्येक जीवाचे पवित्र कारण चित्त आहे. सच्चिदानंद म्हणजे परिपूर्ण प्रेमभाव, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान जागृति, सार्या अस्तित्वाचा उगम, आणि तरी सर्व अस्तित्वाचे स्थान व त्याचा स्रोत. त्याला पवित्र जागृति, पवित्र आकार, अस्त्तित्वाचा आधार, आणि इतरही नावे आहेत. योगी व्यक्तीचे एक ध्येय असते ते म्हणजे मनाची स्वाभाविक अवस्था, मनाच्या वृत्ति योगानुष्ठानाने थोपवून सच्चिदानंदाचा अनुभव प्राप्त करणे. निरंतराभ्यासी योग्याला किंवा ध्यानीला या सच्चिदानंदाचा अनुभव सर्व सृष्टीतून वाहत असलेल्या एकात्मतेशी एकरूप होऊन किंवा त्यात विलीन होऊन होतो. या अनुभवाला सविकल्प समाधि म्हणतात. परमगुरु योगस्वामी या अवस्थेचे असे वर्णन करतात: “सत् चित् आनंद. ही एकच गोष्ट आहे. सच्चिदानंद. सत् म्हणजे तुमचे अस्तित्व. चित् आहे सर्वव्याप्ति, प्रकाश, सूर्यापासून मिळतो तो, सर्वज्ञ. आनंद (मराठी वाचकांना याचा वेगळा अर्थ सांगण्याची आवश्यकता भाषांतरकाराला वाटत नाही.) हे तीन भिन्न असले तरी एकच आहेत. तो तुमचा स्वभाव आहे.” वेगळ्या शब्दांत सांगायचे म्हणजे हिंदु विचारसरणीत आपण परमेश्वराचे अस्तित्व सर्वव्यापि जागॄति, सच्चिदानंद याप्रमाणे व्यैयक्तिक पध्दतीने स्वानुभावाने सिध्द करू शकतो. परमेश्वराचे अस्तित्व सिध्द करण्याचा हा एक गूढ मार्ग आहे. श्रध्देच्या सरकणार्या वाळूच्या आधारावरचा हा मार्ग नाही. योगस्वामींच्या मते, ते परम्रेश्वर प्रत्येकाचा अत्यंत अन्तस्तम सत्व आहे असे निश्चयपूर्वक सांगत असल्यामुळे, परमेश्वरावर विश्वास न ठेवणे म्हणजे स्वतःवरच विश्वास न ठेवण्यासारखे आहे. असे कोणाला करावेसे वाटेल?
सच्चिदानंद स्थितिचे वर्णन अद्वैत जागृति आणि मूलभूत जागृति असेही करता येते आणि काही वैज्ञानिक प्रबंधात असाही सिध्दांत प्रस्तुत केला आहे की अद्वैत जागृति ही या विश्वाच्या अस्तित्वाचा पाया आहे. उदाहरणार्थ, इ.स. २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या “मूलभूत जागृति: विज्ञान, तत्त्वज्ञान आणि आन्वीक्षिकी यांचे एकत्रीकरण करण्यासाठी एक अनुसंधान” या प्रबंधात डॉ. नील डी. थीस्, आणि प्रा. मेनास सी. काफाटोस्, संगणकीय पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक, त्यांच्या कल्पनांचा सारांश सुरुवातीला असा देतातः “येथे प्रस्तुत केलेले मूलभूत जागृतिच्या वास्तविकवादावर आधारलेले अनुसंधान असे गृहित धरून चालते की अद्वैत जागृति ही विश्वाच्या अस्तित्वाचा पाया आहे; तिचा निर्माण उच्च स्तरावरच्या अपूर्व गोष्टींवर किंवा परस्परप्रतिक्रियामुळे होत नाही. हे अनुसंधान जागृतिचे नैसर्गिक गुणधर्म समजून घेण्यासाठी तीन अन्वेषण क्षेत्रे, विज्ञान, तत्त्वज्ञान, आणि आन्वीक्षिकी, यांची तुलना आणि एकत्रीकरण करण्यास अनुमति देते. या अनुसंधानात जागृति ही मूलभूत वस्तुस्थिती आहे, जी कशातही उतरू शकत नाही. जागृति आणि अस्तित्व एकच आहेत. तात्पर्य, हे विश्व सर्वत्र स्वयंसंघटित, परस्पर पूरक, प्रक्रिया प्रबाधित, पुनरावृत्ती होणार्या परस्परक्रियांचे एकाच वेळी स्वयंपूर्ण आणि अपूर्ण असलेल्या भागांचे अजड संघटन आहे. हे विश्व स्वतःचे प्रथम निरीक्षक आणि निरिक्षणाचा विषय असे दोन्ही आहे. जे जग अजड आणि प्रथमतः जागृतिचे असलेले समजले तर विज्ञाप्तिला जडतेच्या वरचे, कर्माला कारणाच्या वरचे स्थान देणे, आणि आपल्या आकलनशक्तिचे आतले आणि काल्पनिक भाग हे काही “कठीण प्रश्न” नाहीत, परन्तु सर्व अस्तित्वाचे मूलतत्त्व आहेत असे समजणे आहे. हे दृष्टिकोन प्रचलित पाश्चिमात्य तत्त्वज्ञान परंपरा, सांस्कृतिक दृष्ट्या विविध चिंतनशील आणि गूढ परंपरा प्रतिबिंबित करतात आणि सद्यकालीन वैज्ञानिक, गणिताने व्यक्त करणे शक्य असलेल्या विचारांना अनुसरून आहेत. ज्या वाचकांना qualia आणि या शब्दांची माहिती नसेल, त्यांच्यासाठी qualia म्हणजे आपल्या इंद्रियांच्या आकलनशक्तिचे बाह्य अद्भूत घटनांनी उत्तेजित झाल्यामुळे होणार्या संवेदनांचे आतले आणि काल्पनिक भाग. Holarchy म्हणजे एकाच क्षणी स्वयंपूर्ण आणि अपूर्ण असलेल्या भागांचे संघटन.
थीस आणि काफाटोस यांच्या प्रबंधातील दृष्टिकोन खरोखरच प्रोत्साहन देणारा आहे, ज्यावरून असे दिसते की वैज्ञानिक जगतात हळूहळू परमेश्वराच्या रूपाबद्दल आणि त्याचा आधुनिक पदार्थविज्ञानाशी काय संबंध आहे याबद्दल विचारपरिवर्तन होत आहे. आम्हाला आशा आहे की फार दूर नसलेल्या भविष्यकाळात हिंदु तरुणांचे विश्वविद्यालयातील अनुभव नवीन होकारार्थी निष्कर्षांकडे नेतील आणि घरी परत आल्यानंतर ते आपल्या आईवडिलांना जाहीर करतील की “परमेश्वर या विश्वाचा मूलभूत आधार आहे हे आता आधुनिक वैज्ञानिक विचारांनी सिध्द झाले आहे आणि ते गणिताने सूचित करता येते. आपले हिंदु ऋषी हजारो वर्षांपूर्वी बरोबर होते!”
जो पर्यंत हे स्थानांतर होत नाही तो पर्यंत आपल्या तरूण मंडळींना धर्मनिरपेक्ष, धर्मविरोधी विश्वविद्यालयीन अनुभवासाठी आईवडिलांनी आणि हिंदुधर्माच्या शिक्षकांनी एक धोरण धरणे आवश्यक आहे. हिंदुधर्म आपल्या जागृतिच्या स्थितींना समजून घेण्याचा आणि त्यांना नियोजित करण्याचा मार्ग आहे. त्यात क्रोध, भय, चिंता, स्वतःबद्दल शंका येणे, यासारख्या नकारात्मक अवस्थावर मात मिळविण्यासाठी अनेक अनुष्ठाने आहेत. त्याशिवाय, तो आपल्याला आपले वरच्या स्तरावरचे अंतरसुख आणि समाधान मिळविण्यासाठी ध्यानाचे तंत्र शिकवतो, जेणेकरून सरतेशेवटी सर्व जनांत आणि सर्व जडवस्तूत असलेल्या, सर्वव्यापि असलेल्या त्या एका दैवी अंतःकरण याचा शोध लागू शकतो. श्वेताश्वतर उपनिषदात एका ऋषींनी फार पूर्वी म्हटल्याप्रमाणे, “सर्व जनांत लपलेला, त्यांचा सर्वांत आत असलेला आत्मा, सर्वात असलेला, तो परमेशवर आहे. तो या ईश्वरलीलेवर लक्ष ठेवतो, सर्व वस्तूत राहतो, सर्व वस्तूंचे निरिक्षण करतो. या निसर्गाच्या तीन अवस्थांच्या पलिकडचा तो एक निर्मळ चैतन्य आहे.”